परभणी (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकटात कोट्यावधी लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. औद्योगिक क्षेत्र, ग्रामीण उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. परिणामी, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर कमी केले जात आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा टक्का वाढतोय. मात्र, तितक्या प्रमाणात नौक-या उपलब्ध नाहीत. म्हणून कुशल-अकुशल, गरजूंना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा तसेच बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करता यावी, यासाठी गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड येथे दिनांक ५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी परभणी जिल्हास्तरीय नौकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील कोणत्याही तरूण, तरूणी तसेच गरजूंना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सिक्युरीटी, सुपरवायझर, ड्रायव्हर, हेल्पर, शिपाई, सहाय्यक, क्लर्क, विभाग प्रमुख, व्यवस्थापक, औषधनिर्माता, डिलीवरी बॉय, टेलिकॉलर, परिचारीका, डॉक्टर, अभियंता, वायरमन, इलेक्ट्रीशन यासह विविध क्षेत्रातील अनेक पदासाठी भरती केली जाणार आहे.

या मेळाव्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील ५० कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जवळपास ३५०० पात्र उमेदवारांना नौकरी मिळणार आहे. त्यासाठी इयत्ता पाचवी ते पदवीत्तर पदवी शिक्षण घेतलेल्या कोणत्याही शाखेतील तरूण, तरूणी, नागरिक, महिला तसेच गरजूंना सहभागी होता येणार आहे. एक उमेदवार तीन कंपन्यामध्ये मुलाखत देऊ शकतो. परंतु सहभागी होऊ इच्छित व्यक्तीने प्रभाकर सातपुते यांना ८२०८४८०८४६ आणि ९९२१२३७५ या क्रमांकावर संपर्क साधून येत्या २५ ऑक्टोबर पर्यत नावनोंदणी करणे बंधनकारक आहे.

परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण युवकांना त्यांच्या कुशलतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या हातांना काम मिळावे, केवळ हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून आम्ही पूर्ण पादरर्शक पध्दतीने या जिल्हास्तरीय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. आपल्या भागाची गरज लक्षात घेऊन चांगला रोजगार देऊ शकणा-या तब्बल ५० कंपन्यांना आमंत्रित केले असून त्यातून जवळपास ३५०० युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लोकांना मेळाव्यात नावनोंदणी करावी, असे आवाहन मुख्य संयोजक युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांनी केले आहे.