पोस्टर झळकले ! भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा ; लाख रुपये मिळवा...

औरंगाबाद;

शिवसेनचे खासदार संजय राऊत यांना जाणीवपूर्वक ई.डी.ने अटक केली असा आरोप करत शिवसेना राज्यभर आक्रमक झाली आहे. शिवसैनिक प्रचंड संतापले असून खा. संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. औरंगाबादेत तर कमालच झाली चक्क 'भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा ; लाख रुपये मिळवा! 'असे बॅनरच झळकले आहे. सध्या औरंगाबादेत या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील महत्वाच्या क्रांती चौकात दर्शनी ठिकाणी ' भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा, लाख रुपये मिळवा!' असे लिहिलेले ठसठशीत बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

विशेष म्हणजे कालच शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले होते. भाजप शिवसेनासे डरती है.. इडीको आगे करती है ! म्हणत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला होता. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यभर इडी आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलने करत आहे.