कोळीबोडखा ग्रा.पं.च्या कारभारात ‘सरपंच पती’चा हस्तक्षेप वाढल्याने सदस्य त्रस्त

"पत्नी केवळ नावाला सरपंच; पती हाकलतात गावगाडा"

पाचोड(विजय चिडे) ग्रामीण भागातील महिलांना राजकारणातील आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली असली तरी पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथे सरपंचपदी महिला विराजमान झालेल्या आहे. मात्र, या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या पतींचाच कारभार सुरू आहे. पत्नी केवळ नावाला सरपंच असून खरे सरपंच आपणच असल्यागत पतीराजांचा तोरा कोळीबोडखा ता.पैठण येथे पाहावयास मिळत आहे. 

गाव कारभारात ‘सरपंच पती’चा हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने इतर सदस्य त्रस्त असल्याचे सदस्यातून बोले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना निम्मा वाटा देण्याचा सरकारचा उद्देश चांगलाच साध्य झाल्याचे वरकरणी दिसते. परंतु सरपंच पतीराजांचे वाढते वर्चस्व त्यांच्या अधिकारांवर गदा आणत असून बहुतांश सरपंच महिलांना केवळ स्वाक्षरी करण्यापुरतेच विचारले जात आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीं च्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत:हून पुढे सरसावल्या. गाव विकासाचा आराखडा मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत प्रतिस्पर्धीविरोधात निर्भीडपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या.

निवडणुकीत विजयी होऊन यातील काही जणी आता थेट गावकारभारीण बनल्या.बऱ्याच जणी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम करू लागल्या.मात्र कोळीबोडखा येथील महिला सरपंच केवळ रबरी शिक्का झाल्या आहेत. त्यांच्या पतीराजांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वत:सरपंच असल्याच्या थाटात वावरणे, सरपंच खुर्चीवर अतिक्रमण करणे, नागरिकांना स्वत: उत्तरे देणे, ग्रामसेवकांना धारेवर धरणे, ठिकाणी स्वत: जाऊन सरकारी कार्यालयात ऊठबस करणे अशी कामे सुरू आहेत. पत्नी सरपंच असतानाही पतीराज स्वत:चा सरपंच म्हणूनच उल्लेख करतात. महिला सरपंचांनी गाव विकासासाठी स्वत: कामकाज करावे,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शारदा चंद्रभान हातगळे,ग्रा.प.सदस्य कांता बाबासाहेब वैद्य यांनी केली आहे

चौकट-ग्रामसेवक आचले यांना या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी दुपारीच्या वेळी दुरव्धनीवरून संपर्क साधला आसता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवला असल्याने प्रतिक्रिया भेटू शकली नाही.