विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ
गडचिरोली (महाराष्ट्र) दि.२- आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे ती, त्यांच्या क्षमतेला शिक्षण आणि रोजगाराची जोड देण्याची. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासीचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा करीता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षा च्या प्रवेशाकरीता निशुल्क प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
बरेचदा विद्यार्थ्यांना एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेताना आर्थिक चणचण जाणवत असते आणि मग प्रवेश घ्यायचा राहूनच जातो. त्यामुळे ह्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा विचार करून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तालुक्यातील अतीदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. प्राध्यापक स्वतः या भागात फिरून विद्यार्थ्यांना माहिती देतात. जेणे करून विद्यार्थी शिक्षणाकडे वळतील.
गडचिरोली बसस्थानक ते गोंडवाना विद्यापीठा पर्यत प्रवासासाठी बसची सुविधाही करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश तसेच क्रांतिविर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत होणार आहे. वसतिगृहात अधिक विद्यार्थी समावून घेण्यासाठी विद्यापीठाने शासकीय विज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे वस्तीगृह घेण्याचे ठरवले आहे .तेथून विद्यापीठात येण्याची व जाण्याची निशुल्क सोय विद्यापीठ करीत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ला अधिकाअधिक महत्व देत स्वंय रोजगाराचे प्रशिक्षण दिल्या जातेय .
विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत येण्यास त्रास होऊ नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवेशाकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहे तसेच विद्यार्थी सुविधा केंद्र श्री शंकरराव बेझलवार आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ,अहेरी आणि शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
एम .ए. इंग्रजी ,समाजशास्त्र, इतिहास उपयोजित अर्थशास्त्र, मराठी ,जनसंवाद ,एम कॉम, एमएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,संगणक शास्त्र, एमबीए या सर्व अभ्यासक्रमाच्या २०२२-२३ च्या प्रशम वर्षा करीता निशुल्क प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. अतीदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाच ध्यास विद्यापीठाने घेतला आहे.