मंडणगड : काही महिन्यांपूर्वी तालुक्यात शेकडो किलो मांस मुंबईत नेताना पकडल्यानंतरही तालुक्यातील मांस तस्करीचे प्रकार थांबलेले नाहीत. तालुक्यातील लाटवण परिसरात पोलिसांनी रविवारी (१ ऑक्टोबर) पहाटे गोवंशाचे मांस जप्त केले आहे. त्याचबरोबर चार जिवंत गायी व एक वासरूही जप्त करण्यात आले आहे.
लाटवण परिसरात गोवंशाची हत्या होत असल्याची माहिती मंडणगड पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक पहाटेच त्या ठिकाणी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांना गोवंशाचे मांस सापडले, तर त्याचठिकाणी चार जिवंत गायी व एक वासरूही आढळले. पोलिसांनी या कारवाईत दोन चारचाकी गाड्याही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी गाय आणि वासरला मंडणगड पोलीस ठाण्यात आणून ठेवले आहे.
त्याचबरोबर जप्त केलल्या मासाची विल्हेवाट लावून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात उशिरापर्यंत मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे कितीजणांना पकडण्यात आले व मुख्य आरोपी कोण आहे याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.