आरमोरी तहसील कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा - आमदार कृष्णा गजबे

गडचिरोली(आरमोरी:)-1 ऑगस्ट म्हणजे महसूल दिन नवीन महसुली वर्ष सुरू होण्याचा दिवस. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून विकासाकरिता वातावरण निर्मिती महसूल विभाग करतो असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

     ते महसूल दिनी कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानावरून बोलत होते. यावेळी गजबे यांनी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाला महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात 2002 च्या परिपत्रकानुसार महसूल दिन साजरा केला जात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसुली यंत्रणेमार्फत केला जाते. प्रामुख्याने लोकांशी निगडित विविध महसुली तसेच विकास योजनांची माहिती गाव स्वरावर पोहोचवण्याचे कार्य महसूल विभाग करतो. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना विशेष कामगिरी करिता प्रशस्तीपत्र आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते देण्यात आले. आरमोरी तहसीली अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इत्यादी दाखले यावेळी देण्यात आली. महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली.

     यावेळी आमदार कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र, उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, तहसीलदार कल्याण कुमार डहाट, श्री. पवन नारनवरे अध्यक्ष न.प., श्री. हैदरभाई पंजवानी न.प. उपाध्यक्ष, आरमोरी तहसील चे सर्व अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचारी वृंद ही उपस्थित होते.