औरंगाबाद : शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावाखाली घेतला अशी टीका करत यासाठीच शिंदे गटाचा अट्टहास सुरू होता का , असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला . दानवे म्हणाले , वर्ष १ ९ ६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी पक्षाची स्थापना केली . त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देशभरात मोठे झाले आहे . त्यामुळे त्यांचा समोर येऊन पराभव करणे शक्य नसल्याने भाजपने हा डाव खेळला . मात्र , खोकेबहाद्दर आणि गद्दारांना शिवसेना धडा शिकवेल . सध्याचा निर्णय फक्त अंधेरी विधानसभा निवडणुकीपुरता आहे . या निवडणुकीत शिवसेना विजयी होईल . केंद्राच्या दबावातूनच हा निर्णय घेतल्याचे गल्लीतल्या लहान पोरालादेखील कळते , अशी टीका त्यांनी भाजपवर केली . आमदार , खासदार शिंदे गटासोबत गेले असले तरी जनता शिवसेनेसोबत आहे , असे दानवे म्हणाले