राजापूर : ऑक्टोबरच्या १३ तारखेला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान होत असतानाच या ग्रा. पं.मध्ये जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील आणखी ३१ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून त्या ग्रामपंचायतींना देखील आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. 

तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे. यामध्ये मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटूळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विलये, हसोळतर्फे सौंदळ, धाऊलवल्ली अशा ३१ ग्रामपंचायवतींचा समावेश आहे.

यामध्ये एकूण ९६ प्रभागांमधून २४९ ग्रा.पं. सदस्य निवडून द्यायचे आहेत. या ३१ ग्रा. पं. मध्ये नाटे, साखरीनाटे, पाचल अशा तीन ग्रा. पं. चे प्रत्येकी अकरा सदस्य, मिठगवाणे, नाणार, तळवडे, साखर, कळसवली, कोतापूर, ओझर, जुवाठी, हसोळतर्फे सौंदळ, धाऊलवल्ली अशा दहा ग्रा.पं.चे प्रत्येकी नऊ सदस्य, तर परूळे, शिवणेबुद्रुक, वडवली, वाटूळ, डोगर, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, कोळवणखडी, येळवण, खरवते, माडबन, विलये अशा अठरा ग्रा.पं.चे प्रत्येकी सात सदस्य आहेत.

थेट मतदारांमधून सरपंच निवड हा निवडणुकीचा केंद्रबिंदू असल्याने या निवडणुकींना जबरदस्त महत्व प्राप्त झाले आहे. यातील बहुसंख्य ग्रा.पं.मध्ये दरवेळी काटे की टक्कर पाहायला मिळते तशी ती या वेळी देखील अपेक्षित आहे. आता निवडणुकांची घोषणा केव्हा होते. त्याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.