चिपळूण : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा क्रांतीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दि. १६ ऑक्टोबर रोजी मराठा दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून चिपळूण तालुक्यातील सुमारे दोन हजारावर समाज बांधव उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या परंपरांप्रमाणे मराठा दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विविध लढा संदर्भातला आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या वेळी समाजातील उत्कृष्ट व अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जवळपास पन्नास पुस्तके लिहिणाऱ्या व साहित्य क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारे बँकेचे चेअरमन व साहित्यिक तानाजीराव चोरगे यांचा साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय मराठा समाजाच्या उन्नती आणि विकासासाठी पन्नास वर्षाहून अधिक काळ समर्पण भावनेने काम करणाऱ्या व खेडमध्ये मराठा भवन उभारणारे ज्येष्ठ मराठा नेते केशवराव भोसले यांचाही समाजभूषण या पुरस्कार सन्मान करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या पुरस्कार व सन्मानाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बजाविलेल्या मराठा व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अतुलनीय कामगिरी बजावली आहे व त्याची दखल सामाजिक क्षेत्रामध्ये घेतली गेली आहे, अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्यावतीने कोणीही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या चिपळूण कार्यालयाशी ७५०७२०६६७७ या भ्रमणध्वनीवर दि. १२ ऑक्टोपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.