बीड, दि. 07- आगामी सणांच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण बीड जिल्ह्याच्या हद्दीत दि. 8 ते 20 ऑक्टोबर 2022 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.     

         या आदेशान्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त अन्य कोणत्याही व्यक्तिस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालीलप्रमाणे गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. 1) शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदूक, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. 2) लाठ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. 3) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत किंवा बाळगता येणार नाहीत किंवा तयार करता येणार नाहीत 4) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल, अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. 5) जाहीरपणे घोषणा, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरूद्ध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्त्व यांना इजा पोहोचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचवणारी असेल आणि जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करता येणार नाही. 6) व्यक्तिंच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते, आकृत्या किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. 7) कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तिंना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाही. तसेच आदेशाचे पालन करुन कोणताही मोर्चा, सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे