पांढरे सोने बेभाव: 

कापसाला प्रतिक्विंटल 7 ते 8 हजारांचाच भाव

"कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी"

पाचोड(विजय चिडे) गेल्यावर्षी प्रतिक्विंटल विक्रमी १२ हजारांचा दर मिळवणारे पांढरे सोने अर्थात कापूस यंदा गडगडालय. सध्या बाजारात फक्त 6 ते 8 हजारांचा भाव मिळतोय.विशेष म्हणजे दसऱ्यांच्या मुहूर्तावर पाचोड सह परिसरातील व्यापाऱ्यांने काट्यांचे उव्दघाटन केले असून यावेळी तब्बल सोळा हजार रूपये प्रतिक्विंटल कापसाला भाव दिला आहे. मात्र,यानंतर तब्बल सात ते आठ हजार रूपये प्रतिक्विंटल कापसाला भाव दिला जात आहे.

पैठण तालुक्यातील पाचोडसह आडूळ,बालानगर, कडेठाण,विहामांडवा,दावरवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापारी गावातच विकत घेत आहेत. त्यांचे वजनकाटे अधिकृत की अनधिकृत आहेत, याचे कोणतेही मूल्यमापन नाही. कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आंधळा विश्‍वास आजही आहे. मात्र, यातून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. वजन करणारी माणकी खरोखरच त्या वजनाची असतात का किंवा ताण काट्याने मोजल्या जाणारा कापूस बरोबर वजनाने खरेदी केला जातो का, ही पाहणारी कोणतीच यंत्रणा ग्रामीण भागात फिरकत नसल्याने पैसे कमविण्याच्या नादात खासगी व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत.

सध्या विक्रीसाठी असलेल्या कापसात प्रचंड ओलावा (आर्द्रता) आहे. कापसातील ही आर्द्रता भाव कमी होण्यास कारणीभूत ठरली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल 7ते 8 हजार रुपये दरापर्यंत कापूस खरेदी करत आहेत. कारण सध्या कापसात आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. काही ठिकाणी तर अक्षरश: 40 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेला कापूस विक्रीसाठी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. इतकी आर्द्रता असल्यास कापूस सात ते आठ हजार रुपये क्विंटलप्रमाणेच खरेदी केली जात आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर कापसाला20 हजार, 16 हजार प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात असा भाव कुठेही नाही किंवा हा भाव सद्या तरी शक्य नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील ही चर्चा निरर्थक असल्याचे लक्षात येते.

दरवर्षी शेतीमशागत, कापूस लागवड, कापूस वेचणीपर्यंत लागणारा खर्च शेतकरी उसनवारीने करतो किंवा व्याजाने घेऊन कर्जबाजारी होतो. पैसे परत करण्यासाठी मिळेल त्या भावात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. तेव्हा खासगी व्यापारी मनमानी भावातून शेतकऱ्यांची लूट करतात. हातदांडी किंवा ताण काट्यावर कमी कापसावर, तर जमेल तसा काटा मारून भाव कमी व जास्तीचा कापूस शेतकऱ्यांचा नेतात. पूर्ण कापूस (झाड गंजी) द्यायची झाली, तर कुठे २५ किलो तर कुठे ४० रुपये किलोच्या फारीप्रमाणे कापूस घेतला जातो. मात्र, २०, १० किंवा ५ किलोच्या मणक्या वजनकाटा तपासणाऱ्या यंत्रणेकडून खरंच तपासून घेतलेल्या असतात का, याचेही कोणते तारतम्य दिसत नाही. तराजू काट्याचेही तसेच असून या सर्व प्रकारातून लूट करण्याचा गोरखधंदा ग्रामीण भागात सुरू आहे. यासाठी वैधमापन यंत्रणेने ग्रामीण भागात फिरून वजन काटा व मापाची तपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्‍या भावात कापूस देण्यासाठी तयार असतात. त्‍यातही मापात पाप केले जात असल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडूनही फसवणूक केली जात आहे.