सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे जिल्हापरिषद शाळेजवळील धोत्रा रोडवरील चौकाला आलमगीर औरंगजेब चौक या नावाचे फलक लावण्यात आले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला.अब्दुल सत्तार आणि भाजपा युतीचे स्पष्ट बहुमत असलेल्या शिवना ग्रामपंचायत येथे बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेत एका चौकाला क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेबाचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका चौकास टीपू सुलतानचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला आहे.29 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला असून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांची कोणतीही हमी नसताना ग्रामविकास अधिकारी के. बी. दौड यांनी या ठरावाला संमती दिली. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.एकीकडे औरंगाबाद चे संभाजीनगर असे नामकरण करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने आग्रही पाऊल टाकले असताना शिवना गावात त्याच नावाचे उदात्तीकरण करण्यात आल्याने हिंदुत्ववादी जनतेत संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही परिस्थिती निवळण्यासाठी अजिंठ्याचे सदर पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी पाहणी केली. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सरपंच कौशल्याबाई वाघ, उपसरपंच गणेश सपकाळ आणि ग्रामविकास अधिकारी के. बी. दोड यांनी सायंकाळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून तातडीने बैठक घेतली. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या या चुकीमुळे परिसरात तणावाची परीस्थिती निर्माण झाली होती.