प्रेट्रोल पंपचालकाला मारहाण करून 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसाने पंपचालकाला जबर मारहाण करत खंडणीची मागणी केली होती.प्रदीप रावसाहेब मोटे (वय 35) असे गु्न्हा दाखल पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत लोहगाव येथील पेट्रोप पंपचालक काळूराम दत्तात्रय खांदवे (वय 35, रा. कोपरआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
गेल्या महिन्यात 18 तारखेला ही घटना घडली होती. चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे यांचा लोहगाव भागात पेट्रोल पंप आहे. 18 तारखेला पोलीस कर्मचारी मोटे हे खांदवे यांच्या पंपावर आले. मी पोलीस आहे. तुमचा पेट्रोल पंप चांगला चालतो. कोणी तुम्हाला त्रास देऊ नये आणि आमचीही चलती राहावी यासाठी दरमहा हप्ता द्यावा लागेल, असे मोटे यांनी खांदवेना सांगितले. एवढेच नाही तर यावेळी झालेल्या वादात खांदवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम यांना पोलीस कर्मचारी मोटे यांनी मारहाण केली. या प्रकरणी खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोटे यांच्या विरोधात खंडणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक एस. लहाणे पुढील तपास करत आहेत