औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चुलत भावाला मारहाण करणाऱ्यांना समजावण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केल्याप्रकरणी तिघांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के . एस . जाधव यांनी ठोठावली . बाबासाहेब शंकर मुरमे ( २८ ) , ज्ञानेश्वर शेषराव मुरमे ( ४० , दोघे रा . बनगाव , ता . जि . औरंगाबाद ) आणि तेजस सुभाष किर्दत ( २८ , रा . संभाजी कॉलनी , एन -६ सिडको ) अशी आरोपींची नावे आहेत . या प्रकरणात परमेश्वर अंबादास दिवटे ( २१ , रा . बनगाव , ता.जि. औरंगाबाद ) यांनी फिर्याद दिली होती . त्यानुसार , १६ मार्च २०१८ रोजी रात्री चुलत भाऊ राजू दिवटेने फिर्यादीला फोन करून एमआयडीसी शेंद्रा येथील बीएसएनएल टॉवरजवळ भांडण झाल्याचे सांगून बोलावून घेतले . त्यामुळे फिर्यादी मित्रांसह बीएसएनएल टॉवरकडे गेले . त्या वेळी वरील तिघे आरोपी राजूला दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण करताना दिसले . म्हणून फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता , आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली . आरोपी बाबासाहेब मुरमेने फिर्यादीची गच्ची पकडली , तर ज्ञानेश्वर मुरमेने फिर्यादीला कानशिलात लगावत मारहाण केलीआरोपी तेजसने बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून डोके फोडले . या प्रकरणात करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन जमादार जी . एस . भताने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज आणि उद्धव वाघ यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले . दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्ष - पुराव्यांवरून न्यायालयाने वरील तिघा आरोपींना कलम ३२४ अन्वये एक वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजारांचा दंड , कलम ३२३ अन्वये तीन महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला आहे