उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारातील वाहक मंगल सागर गिरी यांना सोशल मीडियावर रिल्स अपलोड केल्याच्या कारणावरून केलेली निलंबनाची कारवाई अत्यंत चुकीची आहे. सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, विविध विभागातील सरकारी अधिकारी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात, त्यात गैर काहीच नाही. मंगल गिरी यांच्यावर केलेली कारवाई कठोर आहे, त्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
सोशल मीडियाचे माध्यम अत्यंत प्रभावी आहे, त्याचा वापर सर्वच लोक करतात परंतु महिला वाहक मंगल गिरी यांनी त्याचा वापर केल्याने एसटी महामंडळाचे काय नुकसान झाले? कामावर त्याचा काय परिणाम झाला का? कामात त्यांनी कुचराई केली का ? अशा कारणास्तव निलंबित केले असते तर कोणीही आक्षेप घेतला नसता परंतु केवळ सोशल मीडियाचा वापर केल्याने कारवाई केली आहे हे अत्यंत चुकीचे आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यात काही गैर आहे असे आगार प्रमुखांना वाटत असेल तर त्यांनी मंगल गिरी यांना त्याबाबत समज द्यायला हवी होती.
एसटी महामंडळाच्या बस वेळेवर धावत नाहीत, बसची अवस्था अत्यंत दयनीय असते, अनेक एसटी बस नादुरुस्त आहेत. बस स्टँडची अवस्था बघवत नाही, या प्रश्नांकडे लक्ष देणे, प्रवासी व कर्मचारी यांच्या हिताकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कर्मचारी बेशिस्त वागत असतील तर कारवाई करण्यापूर्वी समज देणे गरजेचे आहे पण मंगल गिरी यांच्याबाबतीत असे काहीही न करता तडकाफडकी निलंबित करणे चुकीचे आहे. एसटी महामंडळाने या घटनेची दखल घेऊन मंगल गिरी यांचे निलंबन रद्द करावे व कारवाई करणाऱ्या आगार प्रमुखावर कारवाई करावी, असे राजहंस म्हणाले.