रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किर्तीकिरण पुजार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी चक्क सुटीच्या दिवशी पदभार हाती घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. रविवारी त्यांनी पदभार हाती घेवून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीला जि.प.मध्ये हजेरी लावली. 

जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड या प्रसुतीकालीन रजेवर गेल्या आहेत. त्यांची बदली झाली नसली तरी त्यांच्या जागी किर्तीकिरण पुजार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली कुठे झाली? याबाबत अजूनही संभ्रमावस्थाच आहे. पुजार यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी पदभार हाती घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. रविवारी जि.प. भवनात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला किर्तीकिरण पुजार यांनी हजेरी लावत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी स्वच्छता व तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये, महिला बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते.