खेड : गेले काही दिवस परतीच्या पावसाने तालुक्यात जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने हळव्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने हळवी शेती वेळीच कापणीला आली आहे. गणपती उत्सव संपल्यावर शेतकरी हळव्या शेतातातील पीक खळ्यात घेण्याच्या तयारीत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानं शेतात आडवी झालेली पिकं पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे शेतीचे नुकसान शेतकऱ्याच्या जिव्हारी लागत आहे. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

कोकणातील मुख्य पीक असलेली भातशेती ही हळव्या आणि महान अशा दोन प्रकारात केली जाते. जी शेती वरकस असते म्हणजे ज्या शेतीत उशिरापर्यंत पाणी साचून राहत नाहीत त्या शेतीमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला हळवी शेती म्हटले जाते तर पाणथळ शेतांमध्ये केल्या जाणाऱ्या शेतीला महान शेती असे संबोधले जाते गणेशोत्सव संपता संपता हळवी शेती कापणीला येते त्यामुळे गणेशोत्सव संपताच शेतकरी शेतात पिकलेली हळवी पिकं खळ्यात घेण्याच्या तयारीला लागतात यामध्ये प्रामुख्याने भात, नाचणी आणि वरी पिकाचा समावेश असतो अलीकडे कोकणात वरीचे पीक तितकेसे घेतले जात नाही पण भात आणि नाचणी ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. 

यावर्षी पाऊस दमदार झाल्याने हळवी पिके वेळेत कापणीला आली आहेत. गणेशोत्सव संपताच शेतकरी हळवी पिके कापून घरी आणण्याच्या तयारीलाही लागले होते मात्र गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने शेतात पिकलेले हळवी पिके खळ्यात घ्यायची कशी ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गेले चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे शेतीत पाणी साचून पिकलेल्या पिकांचे नुकसान ;होऊ लागले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

गेली काही वर्षे कोकणातील शेतकऱ्यांना लहरी पावसाचा चांगलाच फटका बसू लागला आहे. २००५ साली कोकणात अतिवृष्टी झाली या मध्ये कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेती वाहून गेली, शेतीचे बांधबंधारे तुटले, कसदार शेतात नदीतील दगडमाती येऊन बसल्याने सोनं पिकवणारी शेतं नापीक झाली. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतातील दगडमाती काढली, बांधबंधारे पुन्हा बांधून घेतले मात्र २०२१ साली कोकणात पुन्हा अतिवृष्टी झाली आणि पुन्हा एकदा कोकणातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

२०२१ च्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरलेले नाहीत. वडिलोपार्जित शेती ओसाड ठेवायची नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत शेतकरी पारंपरिक शेती करत आहेत. जे काही हाताला लागेल त्यात समाधान मानायचे ही कोकणातील शेतकऱ्यांची धारणा आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणापुढे येथील शेतकरी अगदी हतबल झाला आहे वर्षभर शेतीत राबून जेव्हा चार दाणे घरात घ्यायची वेळ येथे तेव्हा निसर्गाच्या लहरीपणाचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने पारंपरिक शेती करायची कि नाही असा विचार करण्याची वेळी शेतकऱ्यांवर आली आहे.

गेले काही दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिली तर शेतकऱ्यांच्या हाती चार दाणे येतील मात्र निसर्गाचा हा लहरीपणा असाच सुरु राहिला तर मात्र शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.