रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसीतील बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी अशी मागणी भाजपा कामगार आघाडी दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी उभारण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. 

जिल्हाध्यक्ष लिलाधर भडकमकर, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, उपाध्यक्ष अमर कीर, उदय गोवळकर आदींनी सदर मागणीचे निवेदन ना. सामंत यांना दिले. मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी बंद पडल्याने असंख्य कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरची कंपनी पुन्हा सुरू केल्यास युवकांना रोजगार मिळेल असा दावा करण्यात आला. युवकांना नोकरी, व्यवसायाची संधी देणारे नवीन उद्योग रत्नागिरी तालुक्यात उभारावेत अशी मागणी देखील ना. सामंत यांच्याकडे करण्यात आली.