मंडणगड : दिनांक ३०/०९/२०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी, ता.मंडणगड येथील परीचर श्रीमती रेश्मा रमेश साखरे या नियत वयोमानानुसार जिल्हा परिषद शासकीय सेवेतून सेवा निवृत्त झाल्या. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी येथील अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी प्रा आ केंद्राच्या शासकीय वाहनाने सन्मान पूर्वक त्यांच्या घरापर्यंत सोडले. श्रीमती रेश्मा रमेश साखरे या दिनांक ०४/०९/२००३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी येथे अनुकंपा नियुक्तीने परीचर या पदावर हजर झाल्या. आज अखेर त्यांनी १९ वर्षे २६ दिवस आरोग्य विभागात प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रम करीता आरोग्य विभागातील अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी मार्फत श्रीमती साखरे मावशी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. श्रीमती साखरे मावशी यांना निरोप देताना सर्व कर्मचारी भावूक झाले होते. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.