लांजा : बाजारपेठेत लॉकडाऊन काळात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसाला तरुणाने मारहाण केल्याची घटना घडली होती. पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करणे तरुणाला महागात पडले आहे. लॉकडाऊन मध्ये लांजा शहरात पोलिसांनी नाकाबंदी करत असताना महिला पोलीस कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालत कॉलर (ड्रेस वर) पकडली होती. आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झालेल्या न्यायालयाने त्याला 1 महिना साधा कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. फकीर मोहम्मद हुसेन नेवरेकर (37, रा. लांजा बाजारपेठ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, लांजा बाजार पेठेत कोरोना काळात 24 मार्च 2020 रोजी लांजा पोलिस स्थानकातील पोलिस नाईक सुगंधा दळवी या दुपारच्या सुमारास सेवा बजावत असताना फकीर नेवरेकर याची गाडी अडवली. त्याच्याकडे विचारणा केली असता फकीर याला राग आला. त्याने पोलिसांशी हुज्जत घालून अंगावर धावून गेला. तसेच धक्काबुक्की केली. याप्रकरणी सुगंधा यांनी फकीर याच्या विरोधात भा द वी कलम 353, 352, 332, 294, 188, 269, 270, 271 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अँड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश एल. डी. बिले यांनी या खटल्याचा निकाल देत फकीर याला दोषी मानून 1 महिना साधा कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.