रत्नागिरी : मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच शैक्षणिक, सामाजिक ,क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व कै. डॉ.नानासाहेब मयेकर यांचा द्वितीय स्मृतिदिन मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी नानासाहेब मयेकर हे सर्वोच्च नेते होते अशा शब्दांत नानांच्या दूरदृष्टीच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

         

यावेळी नरेंद्र गावंड म्हणाले की, नानासाहेब मयेकर हे सच्चे आणि सर्वात्तम नेते होते. नानांनी सामुहिक जीवन आपले मानले.नानांचे ध्येय सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते.आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर त्यांनी शिक्षण संस्था उभी केली. खूप माणसं जोडली,जपली, अनेकांना आपलेसे केले. प्रेम दिले.बहुजन, कष्टकरी,शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले,अशा नानासाहेब मयेकर यांना कोणीही विसरू शकणार नाही, नानासाहेब मयेकर यांच्या कार्याचा वसा त्यांचे सुपुत्र ,रोहित मयेकर, ऋषिकेश मयेकर, बंधू मयेकर एकूणच मोहिनी मुरारी शिक्षण संस्था चालवत आहेत.आज नाना आपल्यात नसतानाही या शिक्षण संस्थेचे उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. हे श्रेय नानांना जाते. नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्पर्धेच्या विषयांचे त्यांनी आवर्जून कौतुक केले. यावेळी डॉ. नाना यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी विचार व्यक्त करून नानांच्या कारकिर्दीचे स्मरण केले. 

     

डॉ.नाना मयेकर यांचे उद्दिष्ट, कार्यप्रणाली , व्यक्तिमत्व अनेकांना पुढे घेऊन जाणारे होते.काम करण्याची हातोटी ,संघटन कौशल्य फार वेगळे होते.कोणतेही काम तडीस नेण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. सामर्थ्य होते.त्यामुळे शिक्षण संस्थेचा विस्तार वाढताना दिसत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिक्षण संस्था प्रयत्नशील असल्याचे चेअरमन बंधू मयेकर यांनी सांगितले. प्रारंभी डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रोहित मयेकर यांनी केले.या कार्यकमाला चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष नंदूकाका साळवी ,सचिव रोहित मयेकर, कोषाध्यक्ष ऋषिकेश मयेकर, श्रीम. दिप्ती मयेकर, मालगुंड शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत, संचालक किशोर पाटील , सरपंच सौ.गोवळकर, माजी सरपंच सुभाष रहाटे, जाकादेवी येथील मुख्याध्यापक बिपीन परकर, मालगुंड येथील मुख्याध्यापक नामदेव वाघमारे काजुर्लीतील मुख्याध्यापक दिनेश पवार,महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पाल्ये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, यांसह परिसरातील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

२ ऑक्टोबर गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचे महत्व केंद्रीत करून माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग दर्शविल्याने या कृतीचे शिक्षणप्रेमींसह ग्रामस्थांनी कौतुक केले. नानांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.