रत्नागिरी : एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली.
पूणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देवेंदर सिंह कार्यरत होते. तर मावळते जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने बदलून जात आहेत. पुणे येथे संचालक पदापूर्वी त्यांनी आधी अकोला आणि चंद्रपूर येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. 5 वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडिया अशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता.
देवेंदर सिंह यांनी आयआयटी रुडकी येथून संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सदीच्छा भेटीसाठी आलेल्या पत्रकारांशीही संवाद साधला.