आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरासह ग्रमीण भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटना निदर्शनास येत असल्यामुळे सराफ दुकानदारांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी केले.आष्टीचे विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडा येथे सराफ दुकानदारांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले की, आष्टी तालुक्यात शहरासह ग्रामिण भागातून सध्या चोरीच्या घटना निदर्शनास येताना दिसत आहेत. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडू नयेत, म्हणून प्रत्येक नागरीकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सराफ दुकानदारांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोतोपरी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असून सोने तारण करताना बँड व अधिकृत पावतीची खात्री करुन घ्यावी. खरेदी केलेल्या सोन्याची संबंधीत ग्राहकाकडे पावती असेल तरच खरेदी करावी. तसेच चोरीची कुठलीही वस्तू घेऊ नये. इत्यादी सुचना करतानाच, दुकानात एखाद्या कामगारांची नेमणूक करताना आधार इतर ओळखपत्राची तपासणी करावी. सीसीटीवी व रात्री दुकानासाठी सुरक्षारक्षक हा नेमणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

याप्रसंगी कडा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, गोपनीय विभागाचे पो.काॅ.रियाज पठाण, मंगेश मिसाळ, सचिन कोळेकर यांच्यासह सराफ दुकानदार चंदुकाका ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्रबोध दळवी, झेड के ज्वेलर्स सुमित भंडारी, प्रदीप वेदपाठक, पटवा ज्वेलर्स रिंकू पटवा, विजय वेदपाठक, रंगनाथ महामुनी, प्रशांत वेदपाठक आदी उपस्थित होते.