परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याने पोलिस दलाने बालविवाह रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करुन जनजागृती करावी अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिल्या.

 पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी कैलास तिडके, जिपचे महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, बालविवाह ही सामाजिक समस्या आहे. बालविवाहामुळे मुलींचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारी येऊन पडते. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर आणि अंगणवाडीताई यांच्या माध्यमातून होणारे बालविवाह रोखण्यात यावे. तसेच 2 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत बालविवाह रोखणे व विधवा प्रथा बंदीचा ठराव घेण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच पोलिस दलाच्या माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस ठाण्यात कार्यरत भरोसा सेलच्या माध्यमातून पिडित महिलांना दिलासा देण्याचे काम करावे. पतीला किंवा सासरच्या लोकांना नोटीस देण्याचा कालावधी शक्य होईल तेवढा कमी करावा. तसेच नोटीस दिल्यावर संबंधित उपस्थित राहत नसेल, तर संबंधीतावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणांच्या इमारतीमध्ये समुपदेशन केंद्र सुरु करुन त्याठिकाणी पिडीत महिलांचे समुपदेशन करावेत. भरोसा सेलकडे येणाऱ्या महिलांना किमान कौशल्य विकास विभाग किंवा माविमच्या सहकार्याने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे संबंधित महिलेला रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल. तसेच महिला व बालविकास विभागाने अशा महिलांसाठी ‘स्वाधार गृह’ प्रस्ताव सादर करावेत. यावेळी अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, बाल विवाह, पीसीपीएनडीटी व महिलांसंबंधी असलेल्या इतर विविध प्रकरणांबाबत आढावा घेतला. तसेच भरोसा सेल, निर्भया पथक यांची देखील पाहणी केली. तसेच विधी व सेवा प्राधिकरण केंद्र येथे देखील भेट देवून अत्याचारित महिलेसाठी कार्यान्वित असलेल्या मनोधैर्य योजना व इतर योजनांचा आढावा श्रीमती चाकणकर यांनी यावेळी घेतला.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते निर्भया पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर, शेख रहिमा, करुणा मालसमिंदर, त्रिवेणी चोपडे, अंतलका फुफाटे, किर्ती पानगे तर भरोसा सेल मधील सिमा चाटे, शकुंतला एकाडे, वंदना चव्हाण, संघमित्रा होळकर, आशा लांडगे, शबाना शेख, नागेंद्र मोळके, कृष्णा मुंढे, संजय शेळके, मुकुंद लाड, मधुकर चट्टे आणि शिवाजी घुगे या पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला आहे.

शुक्रवारी(दि.30) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सेलू येथील पिडितेची भेट घेवून चर्चा करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच राज्य माहिला आयोग आपल्या पाठीशी असुन शक्य ती मदत करुन आपणास लवकरात-लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगुन कुटूंबास धीर दिला.

जिल्हा महिला बाल विकास कार्यालय यांनी तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली. यावेळी बैठकीस महिला आणि पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.