औरंगाबाद, दि. 30  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 ऑक्टोबर रोजी  महाराष्ट्र राजपत्रित मुख्य परीक्षा-2021 महाराष्ट्र अभियांत्रिकी  मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 10 ते 12 व दुपारी 2 ते 5  या वेळेत एम.जी.एम पॉलिटेक्निक, एन-6 सेंट्रल नाक्याजवळ सिडको, औरंगाबाद उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदरील परीक्षेसाठी एकूण 44 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 ऑक्टोबर रोजी  औरंगाबाद जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र यांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 11 ते 12 व दुपारी 3 ते 4 या वेळेत एम.जी.एम पॉलिटेक्निक, एन-6 सेंट्रल नाक्याजवळ सिडको, औरंगाबाद उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण 68 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 3 ऑक्टोबर रोजी  औरंगाबाद जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 वनसेवा मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन-8, सिडको औरंगाबाद सकाळी 11 ते 12 व दुपारी 3 ते 4  या वेळेत उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी एकूण 145 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी एकूण 49 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र, स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षेच्या कालावधीत उमेदवार यांच्या बैठक क्रमांकानुसार दिलेल्या A,B,C,D वर्णाक्षरांच्या संचापैकी त्याला दिलेल्या वर्णाक्षरांचाच प्रश्नपुस्तीकेचा संच वापरत आहे. यांची पर्यवेक्षक व समवेक्षकांनी सातत्याने खात्री करावी.

उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची व छायाकिंत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य, वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे.

उमेदवार त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी  व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.

प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.