रत्नागिरी : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या गोवा आणि रत्नागिरीतील शिष्यवर्गाची ''पदस्पर्श'' गुरूपौर्णिमा शास्त्रीय गायन मैफल उद्या (ता. १) येथील थिबा पॅलेसजवळील गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर रंगणार आहे. मैफलीला उद्या सकाळी ९ वा. सुरवात होईल. या वेळी तेजा ढवळीकर, समीक्षा काकोडकर, शिल्पा डुबळे, विनया परब आणि नितीन ढवळीकर हे डॉ. मारुलकर यांचे शिष्य शास्त्रीय गायन करतील. स्वराभिषेक संस्था आणि प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी विदुषी डॉ. अलकाताईंसह रत्नागिरीतील ज्येष्ठ गायक प्रसाद गुळवणी, प्रसिद्ध मोहनवीणा वादक गोसावी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजशेखर मलुष्टे, गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी सात अशा दोन सत्रात रंगणाऱ्या या मैफलीला महेश दामले आणि वरद सोहनी हे संवादिनी व प्रथमेश शहाणे, प्रथमेश देवधर हे तबलासाथ, तसेच ऋता पाटणकर निवेदन करणार आहे. मैफली सर्वांसाठी खुली असून शास्त्रीय संगीतप्रेमींनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.