मंडणगड : उत्तर रत्नागिरीतील मंडणगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असून यामध्ये खैर जातीच्या वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. रंग तसेच कात बनविण्यासाठी खैर वृक्षाच्या नाराचा उपयोग होत असल्याने लाकूड माफियांची वक्रदृष्टी खैरावर पडली आहे. मंडणगड तालुक्यातील लाटवण- कादवण परिसरात खैर वृक्षाची तोड सुरू आहे. कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या वनविभागातील एका कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील लाटवण कादवण परिसरात मंगळवारी घडला होता. दगडफेक केल्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र जंगलाचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मौन पाळले जात असल्याने लाकूड माफियांना अभय कुणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंडणगड तालुक्यात लाटवण कादवण परिसरात खैराची तोड होत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. दिनांक २७ रोजी (मंगळवारी) कर्मचारी माहिती घेण्यासाठी वृक्ष तोड होत असलेल्या परिसरात गेले. मात्र तेथे त्यांच्यावर बेचकीच्या सहाय्याने दगडफेक करण्यात आला. त्यानंतर वन खात्याने अनेक अधिकारी, कर्मचारी मंडणगडमध्ये दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन लाखांची खैराची तोडलेली झाडे जप्त केली असल्याचे समजते. याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
मात्र मंडणगड तालुका वनविभाग आणि मंडणगड पोलीस स्थानकाकडून घडलेल्या प्रकाराबाबत मौन पाळले जात आहे. पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.