रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील समृद्ध कांदळवनांचे संवर्धन व संरक्षणासाठी कांदळवन पर्यटन गाव हा नवा प्रकल्प कांदळवन प्रतिष्ठान व कांदळवन कक्षाने हाती घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना कांदळवन पर्यटन गावासाठी पावस गावाची निवड करण्यात आली आहे. सध्या या कक्षामार्फत सोनगाव येथे क्रोकोडाईल सफारी, आंजर्ले येथे निसर्ग पर्यटन योजना सुरु केली आहे.
कोकणातील कांदळवनाच्या समुद्धीला सुरक्षिततेचे कोंदण देण्यासाठी आणि पर्यटनांतून उद्योग निर्मितीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निसर्गप्रेमी आणि अभ्यासक पर्यटकांसाठी खास ही पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून कांदळवनाच्या विविध प्रजातीवरही माहिती दिली जाणार आहे. किनारपट्टी अधिनियमन क्षेत्रांतर्गत (सीआरझेड) ठिकाण असल्यामुळे या परिसरातील कांदळवनांचे कोणतेही नुकसान न करता ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावस गावाची निवड कांदळवन पर्यटन गाव म्हणून करण्यात आली आहे. पावस गावातून वाहणारी गौतमी नदी ही रनपार खाडीला जाऊन मिळते या खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात कांदळवन क्षेत्र असून याठिकाणी पांढरी चिपी, कांदळ, तीवर, काटेरी, हुरी, किरकिरी, सुगंधासह तब्बल नऊ प्रकारच्या कांदळवन प्रजाती आढळल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस प्रकारचे पक्षी आणि कोल्हा व घोरपड सारखे प्राणी, खाडीमध्ये विविध प्रजातीचे प्राणी, मासे, खेकडे यांचे वास्तव्यही आढळून आले आहेत.
मुळात पावस हे धामिर्क पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाते. स्वामी स्वरुपानंदाची पावनभूमी म्हणून पावस हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याचा फायदाही या उपक्रमाला निश्चित मिळणार असून पर्यटकांचे वास्तव्य पावसमध्ये वाढल्यास परिसरातील छोट्यामोठ्या व्यावसायिकांनाही याचा लाभ होणार आहे. कांदळवन पर्यटन गाव म्हणून या पावसची ओळख निर्माण होणार आहे. कांदळवन प्रतिष्ठान मुंबई व कांदळवन कक्ष रत्नागिरीच्यावतीने पावस येथे कांदळवन सह व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून गंधर्व कांदळवन निसर्ग पर्यटन गटामार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. येणाऱ्या पर्यटकांना या भागात योग्य प्रकारे माहिती व मार्गदर्शन करता यावे यासाठी या गटाच्या सदस्यांना कांदळवनाची ओळख, निसर्गभ्रमंती, पक्षी निरीक्षण यांच्या कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन घेऊन त्यांची तयारी करुन घेण्यात आली आहे. जलपर्यटन, मासेमारी प्रशिक्षण, हौशी मासेमारी या क्रीडा प्रकारच्या सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.