नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगरीचे सेवन केल्यामुळे कन्नड , वैजापूर आणि लासूर स्टेशन येथे एकूण १५५ जणांना मंगळवारी विषबाधा झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती . यानंतर अन्न व औषधी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून वैजापूर येथे भगर विक्री करण्यासाठी तालुका प्रशासनाने बंदी घातली आहे . दरम्यान , आता नागरिकही सतर्क झाले आहेत . ' भाऊ , भगर नको , साबुदाणा द्या ' , असे म्हणत भगर खरेदीकडे नागरिक पाठ फिरवत आहेत . तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने ठिकठिकाणी दुकानांवर छापेमारी सुरू करून निकृष्ट दर्जाच्या भगरीचा साठा ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे . कन्नड शहरात गुरुवारी निकृष्ट दर्जाचा एक लाख ४८ हजार रुपये किमतीचा १ क्विंटल १२८ किलो साठा जप्त केला असून कन्नडला दोन , तर लासूर स्टेशन येथे ४ दुकानदारांवर कारवाई केली . २८ सप्टेंबर रोजीही चार महिलांना भगरीतून बाधा झाली . त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात कन्नड उपचार सुरू आहेत . भगरीचे सेवन केल्यानंतर तालुक्यातील ८ जणांची तब्येत अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते