औरंगाबाद : (दीपक परेराव)औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या तर नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या
निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत. त्यासाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांना अर्ज सादर करावे लागणार आहे. मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघात पूर्वी मतदार असलेल्या शिक्षकांची नावे रद्द झाली असून आता नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. पात्र शिक्षकांनी दिलेल्या मुदतीत निवडणूक आयोगाच्या अर्जातील तपशिलानुसार नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी केले आहे.
राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते.
त्या अनुषंगाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. १९ भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ हा आहे. दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नोंदणी करताना ही घ्यावी काळजी
मतदार नोंदणी अर्ज भरताना तो पूर्ण मराठीत भरावा. अर्ज भरताना पान क्रमांक १ वर पूर्ण माहिती भरून पान क्रमांक ३ वर स्वाक्षरी करावी. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रावर मुख्याध्यापक, प्राचार्यांची सही, शिक्का घ्यावा. अर्जासोबत आधारकार्ड व मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडावी. व्हाईट बॅक ग्राऊंडवर दोन्ही कान दिसतील असा कलर पासपोर्ट फोटो लावावा. प्रथम नियुक्ती दिनांकापासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत ज्यांची तीन वर्षे सेवा होते, असे शिक्षक अर्ज भरू शकतात. १ नोव्हेंबर २०१९ पासून पुढे निवृत्त झालेले शिक्षक अर्ज भरू शकत असल्याने मतदान नोंदणी अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी केले आहे.