मराठा आरक्षणाबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे. आपल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ओळखले जाणारे तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात बोलत असताना दोन वेळा मराठा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प बसला होता, अन् आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे असे बेताल वक्तव्य केले. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची तात्काळ राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व राज्य सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
आघाडी सरकारने २०१४ साली मराठी समाजाला आरक्षण दिले होते परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले होते. तेव्हापासून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक कायदेशीर प्रयत्न झाले परंतु केंद्रातील भाजपा सरकारने यामध्ये कोणतेही सहकार्य केले नाही. राज्यातील भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षातील कोणत्याही नेत्याने यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला नाही हे वास्तव असताना राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडून आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरक्षणाच्या विरोधात आरएसएस, भाजपा आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाकडून घेतली जात असलेली भूमिका, त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने केली जाणारी बेताल आणि आरक्षण विरोधी वक्तव्य त्याचीच उदाहरण आहेत. त्यामुळे आरएसएस, भाजपा व शिंदे- फडणवीस सरकारची ही राजकीय चाल वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा मराठा व आरक्षणाचे लाभ घेणाऱ्या सर्व समाजानी दाखवावी असे आवाहनही राजहंस यांनी केले आहे.