माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी शाखा सदाशिवनगर येथे कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे श्री. सुमित गुलाबराव साबळे वय २७ वर्ष यांनी शेतामधील स्वतंत्र वैयक्तिक डीपीसाठी १५ हजाराची लाच घेताना लाच प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व लाच प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाच प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने रंगेहात पकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेची हकीगत अशी, शेतामध्ये स्वतंत्र वैयक्तिक डीपी बसवला असून त्यास दि. २५/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कार्यालय सदाशिवनगर यांचेकडून चार्जिंग परवानगी मिळाली असून तेव्हापासून सदर डीपी चालू झाला होता. परंतु, त्यास कोणतेही मीटर बसवले नसल्याने तक्रारदार यांना सदर डीपीचे अद्यापपर्यंत कोणतेही बिल आलेले नव्हते. आरोपी साबळे यांनी तक्रारदार यांना सदर विद्युत डीपीसाठी नवीन मीटर बसवण्यास सांगून मीटर बसवल्यानंतर यापुढे तक्रारदार यांना स्वतंत्र बिल येईल असे सांगितले व डीपी चालू केल्यापासून ते आजपर्यंत वापरल्याचे कोणतेही बिल न आकारण्याकरिता १५ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाच स्वीकारली असताना आरोपी साबळे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशी कामे ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. उमाकांत महाडिक यांनी सांगितले