संगम तालुका माळशिरस येथील श्री हनुमान आट्यापाट्या संघ, शिवप्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ संगम यांच्यावतीने आयोजित आट्यापाट्या स्पर्धेत माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, इंदापूर, माढा, करमाळा आदी तालुक्यातील सुमारे ४५ संघांनी सहभाग घेतला. 

प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आट्यापाट्या खेळातील जिल्ह्यातील नामवंत माजी खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न झाला. 

याप्रसंगी जय बिरोबा कचरेवाडी (माळशिरस) विरुद्ध चंद्रकांत सत्रे नांदोरे (पंढरपूर) या दोन संघात सलामीचा सामना झाला. या चुरशीच्या सामन्यात जय बिरोबा कचरेवाडी संघ विजयी झाला. या विजयी संघास प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर -अकलूज च्या वतीने रोख रुपये ५०००/- देऊन गौरव करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय मनोगतात कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या व माजी खेळाडूंना सन्मानित करून उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.