शासन आणि प्रशासन यंत्रणेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. आता नागरिकांनी आपली कर्तव्य बजावणे आवश्यक झाले असून पारदर्शकतेने माहिती अधिकाराचा प्रभावी वापर केला पाहिजे. हा वापरचं आता शासन आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवून त्यांना वळणावर आणू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

           दिनांक २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्व संधेला आज जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. देशमुख यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत आंदोलनाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

         अँड. देशमुख पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर गोपनीयतेच्या कायद्याचा बडगा सातत्याने उभारला जात होता. मात्र जनतेला माहितीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर गोपनीयतेचा कायदा निष्प्रभ ठरला आहे. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी सातत्यपूर्ण रीतीने दिलेल्या लढ्यामुळे हा अधिकार देशातील जनतेला प्राप्त झाला असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

           ग्राम पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत चालला असून जनतेसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन गरजा भागवत असताना भ्रष्ट कारभाराकडे नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे यंत्रणा अस्ताव्यस्तपणे काम करत आहे.

          आता जनतेमधून शासन यंत्रणेवर गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत आणि देशपातळीपर्यंत लक्ष ठेवणारे नागरिक पुढे आले पाहिजेत. त्यांनी प्रशासनाचा कारभार कसा आहे ? हे माहिती अधिकारात जाणून घेतले पाहिजे. अभ्यासपूर्ण लढा दिला तरच माहिती अधिकार टिकेल आणि यंत्रणेवरही दबाव निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

          आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा शासनाने आदेश दिला. मात्र प्रशासन पातळीवर निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर माहिती अधिकारासाठी कार्यशाळा घेऊन जनतेचे प्रबोधन केले पाहिजे. हा कायदा जेवढा जनतेपर्यंत पोहोचेल, तेवढ्या प्रमाणात त्याचा वापर वाढेल. त्यामुळे प्रत्येकाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

         शेकडो, हजारो आणि लाखो कोटी रुपयांचे घोटाळे माहिती अधिकारातून बाहेर आले. भल्याभल्यांना माहिती अधिकारामुळे पद सोडावे लागले. तर अनेकांना जेलची हवा खावी लागली. त्यामुळे हा कायदा क्रांतिकारी ठरला आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्याचा वापर कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चांगल्या उद्देशाने माहिती अधिकाऱ्याचा वापर वाढला पाहिजे, असेही ते म्हणाले.

          माहिती अधिकार दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. माहिती अधिकारातून गाव, राज्य आणि देशपातळीवर आपण विविध कामांमध्ये यंत्रणेला धारेवर धरल्यानंतर देश पातळीवरील यंत्रणा सुधारण्यात आली. याबाबत आपण रेल्वे भूसंपादन, बोगस पिक विमा, यासारख्या मोठ्या मुद्द्यांवर आवाज उठवला. केंद्र शासनाला याची दखल घ्यावी लागली. त्याचप्रमाणे राज्य शासनाने देखील माहिती अधिकाराच्या दबावात आमच्या मागणीवरून पन्नास - साठ ठिकाणी बदल केले, असेही ते म्हणाले.

        प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक आणि नागरिकांचे समूह तयार करणे, नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवने, राज्य कारभारात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणे, शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे, राज्य कारभार आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे, अशा प्रकारचे या कायद्याचे उद्देश आहेत.

          मात्र सद्य परिस्थितीत या उद्देशाकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. याला जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढे नागरिक देखील जबाबदार आहेत. नागरिक हा देशाचा मालक आहे. मालक डोळेझाक करत असल्याने गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिक आता जागा होऊन माहिती अधिकारातून व्यवस्था परिवर्तनाचा भाग बनला पाहिजे असे देशमुख म्हणाले.