औरंगाबाद :आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे . मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ' गर्दी ' जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे . शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे . एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 300 एसटी बुक करण्यात आल्या आहेत . पाच ऑक्टोंबरला सर्व बसेस औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत . औरंगाबादमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून , एकीकडे मतदार संघामध्ये बैठका घेतल्या जात आहेत . तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी एक पत्र आगार प्रमुखांना लिहले असून , त्यामध्ये त्यांनी सुसज्ज 300 बसेसची मागणी केली आहे . सिल्लोडपासून ते मुंबईपर्यंत बसेस येत्या पाच तारखेला देण्यात याव्यात असे पत्र सत्तारांनी आगार प्रमुखांना दिले आहे . त्यामुळे 300 बसेस या सिल्लोडमधून शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी जाण्याची अपेक्षा आहे .