अलिबाग तालुक्यातील आवास येथे क्षात्रैक्य कृषक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 5 जानेवारी ते 9 जानेवारी 2023 दरम्यान हा कृषक महोत्सव आयोजित केला जाणार आहे. शेती आणि शेतीवर आधारीत व्यवसायाना चालना मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महोत्सव आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगीतले.

मेळाव्याच्या आयोजन समितीची बैठक अलिबाग येथे पार पडली त्यानंतर ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभिजीत राणे, अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई आणि आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

क्षात्रेक्य समाजातर्फे दरवर्षी विवीध उपक्रम राबविले जात असतात. शेतकर्‍यांनी आपली शेती विकू नये यासाठीही तसेच शेतीत निरनिराळे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढावे यायसाठी प्रयत्न केला जात असतो. यायाच अनुषंगाने आवास येथे चार दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषक महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यात कृषी क्षेत्राशी निगडीत चर्चासत्र, व्याख्याने आयोजित केली जाणार आहे. राज्यातील विवीध भागातील कृषीनिष्ठ शेतकरी यावेळी हजेरी लावणार आहेत. त्यांनी केलेल्या पिक प्रयोगांचे मार्गदर्शन करणार आहेत.

महोत्सवाच्या निमित्ताने 80 ते 100 स्टॉल्स उभारणी करण्यात येणार असून, यात कृषी साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. फळ प्रक्रीया करून तयार करण्यात आलेल्या विवीध उत्पादनांची विक्री या ठिकाणी केली जाणार आहे. बैलगाडी, कुस्ती आणि शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजनही या मेळाव्यादरम्यान केले जाणार आहे. तसेच शेतीत निरनिराळे प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मानही केला जाणार आहे. हा कृषक महोत्सव सर्वांसाठी खुला असणार असून क्षात्रैक्य समाजापुरता मर्यादित राहणार नाही असेही यावेळी प्रदीप नाईक यांनी सांगीतले.