*शासकीय/गायरान दीड एकर जमिन भूसंपादनाचे तहसीलदार यांना निर्देश*
गंगाखेड/
वीज हा विषय मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला असून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसांची विविध कामे विजेवरती अवलंबून आहेत. एखाद्या वेळेस वीज गेली तर माणसांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. विजेची समस्या जशी शहरी भागात तशी ग्रामीण भागातही पाहावयास मिळते. ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव अधिक असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान विस्कळीत होत चालले आहे.
गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यामध्ये सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. गंगाखेड तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेल्या अनेक गावांना विजेच्या गंभीर समस्या नेहमी भेडसावत. रात्री अपरात्री लाईट गेली तर ती दुसऱ्या दिवशी सकाळीच यायची. त्यामुळे सदरील भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. याचे गांभीर्य ओळखून आ. गुट्टे यांनी गंगाखेड तालुक्यातील मौजे शेलमोहा येथे ३३/११ के.व्ही उपकेंद्र उभारण्यासाठी शासन व संबंधित विभागाकडे मागणी करत सतत पाठपुरावा केला. त्याचे यश म्हणून महावितरण सुधारित वीज वितरण क्षेत्र योजना (RDSS) गंगाखेड अंतर्गत येणारे मौजे शेलमोहा येथे ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी अतिक्रमण विहिरीत शासकीय/गायरान ०.६० हे. आर. जमीन भूसंपादित करून देण्या बाबतचे निर्देश, उप-कार्यकारी अभियंता (स्था.) बा.व दु. उपविभाग महावितरण परभणी यांनी मा. तहसीलदार, तहसील कार्यालय गंगाखेड यांना दि. २२ सप्टेंबर रोजी दिले आहेत.
मौजे शेलमोहा येथे प्रस्तावित ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी दीड एकर जमिनीची आवश्यकता असून सदर गावातील शासकीय/गायरान जमीन भूसंपादित करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता, सं.व सु.उपविभाग,महावितरण गंगाखेड यांना कळवले आहे.
आ. गुट्टे यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. मौजे शेलमोहा येथील प्रस्तावित ३३/११ उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील शेलमोहा, कड्याचीवाडी, अंतरवेली, वाघदरी, तांदुळवाडी, ऊंडेगाव, पिसेवाडी या गावांसह इतर गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.