औरंगाबाद: करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी बस जळाली होती . या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली . हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे . त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल . त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल . स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले . बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल , असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते . त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले . या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता , पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते . पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली