आ. गुट्टे यांच्या पाठपुराव्यामुळे गंगाखेड मतदारसंघात लम्पी स्कीम डिसीजवर लस उपलब्ध
गंगाखेड
लम्पी हा एक त्वचा रोग आहे. त्याची लागण झालेल्या पशुंना ताप येतो. त्वचेवर गाठी येतात. संक्रमित डास, माशा आणि अन्य किटकांच्या थेट संपर्कात आल्याने लम्पी रोग पसरतो. देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश व म्हैस या प्राण्यावर लम्पी आजार पसरला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणासह महाराष्ट्रातील पशुंनाही लम्पीची मोठी लागण झाली आहे.
या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मा. आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे. यांच्याकडे गंगाखेड मतदार संघासह संपूर्ण परभणी जिल्हा करिता लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गंगाखेड मतदार संघातील गंगाखेड तालुक्या करीता २१८००,पालम तालुक्याकरिता १५००० व पूर्णा तालुक्या करीता २३००० लस उपलब्ध झाली आहे. लम्पीमुळे शेतक-यांनी घाबरून जाऊन आफवांवर विश्वास ठेऊ नये. उलट या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी स्वच्छता बाळगून योग्य ती काळजी घ्यावी, तसेच मतदार संघातील पशुंसाठी शासनाच्या वतीने लसीकरण मोहिम सुरू केली असून शेतक-यांनी आपापल्या भागातील पशुवैदकीय रूग्णालयात जाऊन गोवंश व म्हैस पशुंना लस टोचवावी, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
गंगाखेड विधानसभा मतदार संघात पशुंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ५६,५६६, पालम मध्ये ४०,९७७ आणि पूर्णात ६१,३९५ पशु आहेत. त्यामुळे लम्पी स्किन आजार जास्त बळावू नये, यासाठी आ.डाॅ.गुट्टे यांनी संबंधित अधिका-यांना तातडीने लस उपलब्ध करून लसीकरण मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाच्या वतीने गंगाखेड पावले उचलून गंगाखेड मतदारसंघाकरिता लस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
तसेच डॉ.नामदेव आघाव, डॉ.प्रकाश सावने, डॉ.शिवानी पाटील, डॉ.लक्ष्मण कले, डॉ.श्रीनिवास कार्ले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम सुध्दा सुरू करण्यात आल्याचे आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.