राहुरी: काल दि.२० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर जि.जळगाव येथे शिवगर्जना हा पोवाड्याचा कार्यक्रम होता. म्हणून आम्ही सकाळी ७ वाजता राहुरीतुन निघालो कारण २८५ की.मी.जायचे होते. सिल्लोडला चहा घेउन आम्ही निघालो. नेहमी प्रमाणे कलाकारांच्या सोबत एका छान विषयावर चर्चा सुरू झाली. बऱ्याच वेळानंतर आयोजकांना फोन केला की आता मुक्ताईनगर 65 किमी राहीले आहे. मी सांगीतल्याप्रमाणे 2:30 वाजता वेळेवर पोहचतो. काही वेळाने रस्त्याच्या कडे बोर्ड वाचला तर त्यावर लिहिले होते जालना 5 किमी राहीले. माझा मुलगा वरुनला लगेच गाडी थांबवायला सांगीतले. मग लक्षात आले की आपण 80 किमी दुसऱ्या दिशेला आलो आहे. परत 80 किमी परत फिरलो. पण आता मुक्ताईनगरला पोहचायला उशीर होणार होता. कारण तब्बल 180 किमी चुकीच्या दिशेने प्रवास झाला होता. त्यामुळे नियोजित वेळेत कार्यक्रम सुरू होऊ शकत नव्हता.

मग सर्वांनी ठरवले की आता जेवायला थांबलो तर आणखीच उशीर होईल. वरुनने गाडी वळवली आणि परत मागे प्रवास सुरु झाला. (आमचा धाकटा भाऊ बाळकृष्ण हा अगोदर गाडी चालवायचा. पण ४ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला) तेव्हापासुन आमचा चिरंजीव वरुन गाडी चालवतो. (वय 20) सर्वांना खुप भुक लागली होती. पण कर्तव्य पार पाडायचे होते. चुकीचा प्रवास झाल्यामुळे वेळेत पोहचु शकत नव्हतो. त्यावेळी वरुनचे धाडस पहायला मिळाले 130 च्या स्पिडमधे तो गाडी चालवत होता आणि अखेर 3 वाजता मुक्ताईनगरला पोहचलो. कारण 2:30 वाजता पोहचतो असे सांगितले होते. पण 30 मिनिटे पोहचायला उशीर झाला.

त्यामुळे कार्यक्रम वेळेवर सुरु झाला. हे सर्व एवढ्यासाठी सांगतो आहे. मी दुसऱ्याला दिलेला शब्द खाली पडु नये म्हणून आमचा बाळु सुध्दा जिवाचे रान करायचा आणि काल मला हेच दिसले की वरुनने सुद्धा तेच केले. खेळण्याचे वय असुनही वरुन माझ्यासोबत बाळुप्रमाणे समर्पण भावाने वागत आहे. आम्हाला विशेष या गोष्टीचे वाटते की 180 किमी चुकीचा प्रवास होऊनही फक्त 30 मिनिटे उशिराने पोहोचलो. कारण 180 किमी प्रवास करायला सर्वसामान्यपणे किमान पाच ते साडेपाच तास लागतात. मग हे एखादी जादु झाल्याप्रमाणे कसे घडले. आम्हाला चकवा बसला. आमच्या सर्व वाद्यवृंदाचे आभार कारण त्यांनीही उशीर झाल्यामुळे जेवण करण्याचा आग्रह धरला नाही. वरुन सारखा मुलगा आम्हाला आहे याचा खरच अभिमान वाटतो.