परभणी,दि.20(प्रतिनिधी) : लैंगिक अत्याचारासंदर्भातील खटले जलदगतीने निकाली काढले पाहिजेत. तरच आपण खर्‍या अर्थाने न्याय्य देवू शकू, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन.बी.सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

           जिल्हा सरकारी अभियोक्ता, जिल्हा वकील संघ व इंडियन अ‍ॅडव्होकेट मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 18 सप्टेंबर रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘न्यायवैद्यक शास्त्र’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

          कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधिश मनोज शर्मा, पोलिस अधिक्षक जयंत मिना, हिंगोली व परभणीतील सर्व न्यायीक अधिकारी, तपासणी अंमलदार, विधिज्ञ, वैद्यकीय अधिकारी व विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

          मुंबईतील कुपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी ‘मृत्युपश्‍चात तपासणी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरेश झांजड यांनी लैंगिक अत्याचाराची तपासणी, जखमांची तपासणी व शस्त्रासंबंधीचा अहवाल या विषयावर मार्गदर्शन केले.

          मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन जे स्वातंत्र्यसेनानी विधिज्ञ होते अशांच्या वकील असणार्‍या वारसांचा यथोचित गौरव करण्यात आला. यामध्ये अ‍ॅड. कै. मुकुंदराव पेडगावकर यांचे नातू अ‍ॅड.जिवन पेडगावकर, थेरबंद (ता.हदगाव जि. नांदेड) येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. नागोराव पाटील यांचे सुपुत्र व नांदेड येथील जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.एस.एन.हाके यांचा समावेश होता.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांनी केले. सुत्रसंचलन अ‍ॅड. गणेश सेलुकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप अ‍ॅड. गोपाल डोडिया यांनी केला. आभार अ‍ॅड.जे.बी गिरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी जेष्ठ विधिज्ञ व विधिज्ञ परिषदेचे सदस्य अ‍ॅड. सतिश देशमुख, अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश घुगे, अ‍ॅड. वांगिकर, अ‍ॅड. रवि गायकवाड, अ‍ॅड. रामजी चव्हाण यांच्यासह सर्व सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी परिश्रम घेतले.