वडवणी ( प्रतिनिधी ) रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वैयक्तिक योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. आपल्या शेतात योजना राबवायची आणि रोजगार हमी योजनेतून मजुरी देखील मिळवायची. अशा प्रकारच्या सदुसष्ठ योजना रोजगार हमी योजने अंतर्गत आपल्या शेतात घेता येतात. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले.

          खडकी येथे वडवणी जन आंदोलनाच्या तालुका समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. खडकी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर मध्ये हा मेळावा पार पडला.

            अँड. देशमुख पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या योजना बद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे या योजना राबवत असताना अडचणी येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचे संघटन देखील उभे राहिले पाहिजे. जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्याला सहजपणे कोणतीही योजना मिळणार नाही, असे ही ते म्हणाले.

              मनरेगाचे राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजना शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात सक्रियपणाने राबवणे गरजेचे आहे. अनेक उदाहरणे देत त्यांनी या योजनेचे महत्त्व पटवून दिले. तर याच वेळी त्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षित होतील, या पद्धतीने माहिती देखील दिली.

            जनआंदोलनाचे गोरख दराडे, श्रीराम करंडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. गोरख दराडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, खडकी गावात रोजगाराची उपलब्धता आवश्यक आहे.