मास्को:- १५ स.(दीपक परेराव)भारत व रशिया मैत्री करारास 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधुन स्टेट यूनिवर्सिटी ऑफ रशिया, सेंट पिटर्सबर्ग यूनिवर्सिटी, मार्गरिटा रुडमिनो ऑल स्टेट रशिया लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर, भारतीय संस्कृती परिषद नवी दिल्ली, मुंबई विद्यापीठाचे सेंटर फॉर युरेशियन स्टडीज, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि अखिल भारतीय साहित्य परिषद, मुंबई यांच्या वतीने दिनांक 14 व 15 सप्टेंबर रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर दोन दिवसीय चर्चासत्र मॉस्को येथे घेण्यात आले . 

याप्रसंगी प्रा. डॉ. आश्विन रांजणीकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या इंग्रजी भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विनय सहस्त्रबुद्धे, मार्गरिटा रुडोमिनो लायब्ररीचे संचालक पॉवेल कुजमिन, प्रोफेसर संजय देशपांडे, प्रोफेसर बळीराम गायकवाड, श्री सुनील वारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. आश्विन रांजणीकर हे संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री येथे इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दलित आणि अफ्रीकन अमेरिकन आत्मचरित्र यावर संशोधन केले असून आता पर्यत त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 20 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. 

मॉस्को येथील चर्चासत्रात हे पुस्तक प्रकाशित होने ही विशेष महत्वाची बाब आहे कारण 1961 साली अण्णा भाऊ राशियाला गेले होते एका महिन्यापेक्षा अधिक काळ ते रशियात होते आणि भारतात परतल्यावर त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे छोटे पण अतिशय महत्वपूर्ण प्रवासवर्णन लिहिले . 

याच चर्चासत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले.