औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी आहे. या राजधानीतील पर्यटन क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच जागतिक पातळीवरील औरंगाबादच्या पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देणार असल्याचेही ते म्हणाले.
रेल्वे स्थानिक परिसरातील पर्यटन संचालनालयाच्या सभागृहात पर्यटन विषयावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मंत्री लोढा होते. यावेळी संचालनालयाचे सहसंचालक धनंजय सावळकर, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, उपसंचालक श्रीमंत हारकर आदींसह हॉटेल, टुरिस्ट ऑपरेटर्स, गाईड असोसिएशनचे प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती होती.
मंत्री लोढा यांनी फेब्रुवारी महिन्यात वेरुळ फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे उपस्थित सेवा उद्योगातील उद्योजकांना सांगितले. त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालय पुढाकार घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासह व्हर्च्युअल गाईड, जायकवाडी जलाशय बोटिंग सुविधा, मार्केटिंग, जाहिरात तंत्र, हिमायत बाग आदीविषयांवर काम करण्यासाठी उपस्थित प्रमुखांपैकी सहा सदस्यांची समिती स्थापन करावी. त्यांना विषय मार्गी लावण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. सर्वांनीच औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित येत शासनाला सहकार्य करावे व प्रगती साधावी, असेही मंत्री लोढा म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी हरप्रीत सिंग यांनी आभार मानले.