परभणी(प्रतिनिधी)शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी आज शनिवारी (दि.17) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड -अमृतसर संचखंड एक्सप्रेस रोखून धरत आंदोलन करण्यात आले.

यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गाडी संख्या 17058 सिकंद्राबाद ते मुंबई ( देवगिरी एक्सप्रेस) आणि 11402 अदिलाबाद ते मुंबई (नंदिग्राम एक्सप्रेस) या पुर्वी प्रमाणेच प्लॅट फॉर्म क्र 1 वर घेण्यात याव्यात. परभणीकरांसाठी या दोन्ही गाड्या फार महत्वाच्या आहेत व या गाडयांना जास्त यात्रेकरू असतात. संध्याकाळी 5 वाजेपासून ते रात्री 9.09 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म क्र. 1 वर कुठलीही गाडी येत नाही तरी संबंधीत दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्म क्र. 1 वर घेण्यात याव्यात.

परभणी स्थानकावरील सध्या एक्सलेटर व लिफ्टची जी सुविधा उपलब्ध आहे ती स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून फार दूर आहेत आणि नेहमी या सुविधा बंद राहतात. याचा वरिष्ठ नागरिकांसोबत दिव्यांग नागरिकांस खूप त्रास होतो. जो नवीन दादरा तयार करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लिफ्टची सुविधा लवकरात लवकर देण्यात यावी.

परभणी रेल्वेस्थानक हे मुख्य जंक्शन असून येणा-या जाणा-या प्रवाशांची संख्या लक्षात घेता परभणी स्थानकावर वाताकुलित वेटींग हॉलची सुविधा देण्यात यावी. एमआरआयडीसी अंतर्गत परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून व.ना.म.कृ.वि. कडे जाणारा उड्डाणपुल व पुर्णा येथील नांदेडकडे जाणा-या रस्त्यावरील उड्डाणपुल यांचे रखडलेले काम त्वरीत सुरू करण्यात यावे.

रेल्वे सुरक्षा बल यांचे संख्या वाढवण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारीवर आळा बसेल. परभणी रेल्वेस्थानकावर ऑटोचालक आपला पॉईन्ट सोडून मुख्यप्रवेश व्दाराच्या समोर आपले ऑटो लावून प्रवाशांना स्थानकात येणा-जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. पुर्णा येथील सिध्दार्थनगर ते बौध्द विहार हा पादचारी पुल रेल्वे मार्गावरून लवकरात लवकर तयार करण्यात यावा. परभणी ते परळीकडे जाणा-या रेल्वे मार्गावरील साखला प्लॉट येथील गेट क्र. 1 ला रोड अंडर ब्रिज करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह शिवसैंनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.