सरकारने शेतकऱ्यांना विशेष अर्थिक मदत देण्याची गरज - अजित पवार
अंबाजोगाई /बीड-अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे ३६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे गोगलगायीनी शेंडे खाऊन नुकसान केले; अनेक शेतकऱ्यांनी तीन,चार वेळा पेरण्या करून विविध उपाय मात्र तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत अजित पवार हे३१ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सहआदी तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींनी उध्वस्त केलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली.
अशा प्रकारचे संकट शेतकऱ्यांना भेडसावल्यास कृषी विभाग विविध तंत्रज्ञान शोधून यावर उपाययोजना शोधणे, शास्त्रज्ञ व्यक्तींना नवीन उपाय शोधायला लावणे, कृषी विद्यापीठातील उपलब्ध माहितीचा विनियोग करणे अशा गोष्टी अपेक्षित असतात, मात्र इथे दोनच व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून राज्याचे सरकार चालवत असून ते प्रत्येक खात्याशी संबंधित प्रत्येक नागरिकांचे समाधान करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव असायला हवी, असेही अजितदादा पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित असल्याचेही यावेळी अजितदादा पवार यांनी नमूद केले.