औंरगाबाद : राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातलं आहे. लम्पीमुळे जनावरांचा मुत्यू देखील होत आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झालं असून आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जनावरांच्या लम्पी स्कीन या आजारासंदर्भात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. जनावरांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पीला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. तसेच लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं आहे. लम्पी सध्या राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे.तर ज्या ठिकाणी लम्पीची लागण झाली त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिसरातील जनावरांचं लसीकरण करण्यात येत आहे. लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापन करण्यात आलेली आहे. दरम्यान, लम्पी बाधित पशुधनाच्या औषधांचा सगळा खर्च सरकार करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.