समुद्र हा वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. असे प्रतिपादन रायगड जिल्हा अप्पर अधिकारी अमोल यादव यांनी अलिबाग समुद्र किनारी स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियान अंतर्गत कार्यक्रमात केले.
यावेळी अलिबाग तहसीलदार मिनल दळवी,अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंके,माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर,संजना किर आदीसाहित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्लास्टिकचे प्रदूषण, कचरा तसेच दूषित गढूळ आणि केमिकल युक्त पाणी प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे.
समुद्राचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आज त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. 2008 मध्ये साजरा करण्यास सुरुवात केलेला जागतिक महासागर दिवस सुरुवातीला केवळ कॅनडामध्येच साजरा केला जात होता. या संदर्भातला प्रस्ताव कॅनडाने ब्राझीलमधील रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक वसुंधरा शिखर परिषदेत मांडला आणि हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. त्यानंतर 5 डिसेंबर 2008 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत 8 जून हा दिवस जागतिक महासागर / समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हापासून युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी साजरा होऊ लागला.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ही आतापर्यंतची सर्वात लांब समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 05 जुलै रोजी सुरू झालेल्या या 75 दिवसांच्या मोहिमेचा औपचारिक समारोप 17 सप्टेंबर 2022 रोजी 'आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिना'च्या निमित्ताने आज सांगता झाली आहे.
जगातील सर्वात गरीब देशांतील लोकांसाठी समुद्र हा पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. प्रथिनांसाठी मासे, मत्स्यपालन आणि मत्स्यपालन यासारख्या प्राथमिक अन्न स्रोतांवर मोठ्या संख्येने लोक अवलंबून असल्याने जगातील लोकसंख्येच्या 8% उपजीविकेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आधार देतात. अति-मासेमारी, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रजातींचे संभाव्य नामशेष यामुळे या मर्यादित संसाधनांवर दबाव आला आहे. यामुळे दुष्काळ, गरिबी आणि युद्ध आणि संघर्ष होऊ शकतो. महासागराचे शाश्वत व्यवस्थापन हाच जागतिक समृद्धी आणि शांततेचा एकमेव उपाय आहे.
त्यांनी पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी सुमारे दोन टेम्पो कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.
यावेळी अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली युथ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विधिध विभागाचे अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.