सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, मका, तूर, बाजरी, सोयाबीन, उडीद याव्यतिरिक्त क्वचितच पिकाची लागवड शेतकरी करायचे. पावसावर पिके अवलंबून होती. उजनी धरण, भीमा, सीना नदी, तलाव, पाटबंधाऱ्यांच्या कामामुळे हळूहळू जिल्ह्यात बागायत क्षेत्र वाढले. उसाचे क्षेत्र सर्वात जास्त झाले. यापाठोपाठ शेतकरी द्राक्षे, डाळिंब आणि केळी ही फळपिकेही घेत आहेत. उसाला जादा पाणी लागत असल्याने आणि जमिनीचा कसं कमी होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आंबा लागवडीकडे वळू लागला आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. कोकणचा राजा आता सोलापूर जिल्ह्यातही वेगाने वाढत आहे.

सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर असते. आंबा पिकाला लागणारे तापमान, खडकाळ जमीन आणि कमी पाणी यामुळे शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. शास्त्रीय आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर कधीच तोट्यात येत नाही. शास्त्रीय माहिती, तंत्रज्ञान कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित आहे, मात्र अंमलबजावणी करण्यात शेतकरी पुढे येताना दिसत नाहीत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी पाण्यात, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

*आंबा 3434 हेक्टर क्षेत्र*

जिल्ह्यात जास्त पाणी लागणाऱ्या उसाच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. जास्त पाण्याने जमिनीचा कस कमी होत असल्याने शेतकरी आपोआप फळपिकाकडे वळू लागला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त डाळिंबाचे 47 हजार 376 हेक्टर तर द्राक्षाचे 17 हजार हेक्टर क्षेत्र आहे. केळी, बोरे, सिताफळाचे क्षेत्रही विस्तारत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आंब्याचे क्षेत्र 3434 हेक्टरपर्यंत वाढले आहे.

*विविध जाती*

हापूसला जिल्ह्यात वातावरण नसल्याने कमी प्रमाणात याची लागवड झाली आहे. बाकी आंब्याच्या जातीला पोषक वातावरण असल्याने केशर, पायरी, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मलिका, रायवळ जातीची लागवड वाढू लागली आहे. यातून एकरी तीन ते चार टन आंब्याचे उत्पादन मिळू लागले आहे.

*सातासमुद्रापार*

जिल्ह्यात आंब्याची लागवड वाढत असून उत्पादन होत आहे. उत्कृष्ठ आंब्याचे उत्पादन होत असल्याने युरोप आणि आखाती देशातून मागणी होत असल्याने सोलापूरचा आंबा सातासमुद्रापार पोहोचला आहे. मागील वर्षी युरोप, आखाती देशात आंब्याची सुमारे 300 ते 350 टन निर्यात झाली आहे.

*शासनाची मदत*

जिल्ह्यात सुमारे दोन हजार आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना कृषी विभाग, कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) मार्गदर्शन करीत आहेत. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंबा लागवड, कीड नियंत्रण, व्यवस्थापन, छाटणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान, निर्यात, बाजारपेठ याविषयीची माहिती दिली जात आहे.

राज्य शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी मदत करीत आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही याची मदत करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून हेक्टरी दोन लाख 19 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे. आंबा फळाला 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे लागते. यामुळे आंबा बागेत 10 वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल, भूईमूग, पालेभाज्या, ताग ही आंतरपिके घेता येतात.

*कोरोना काळात व्हाटसॲप ग्रुपवरद्वारे मार्गदर्शन*

जिल्ह्यात आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांनी दोन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपमध्ये कृषी अधिकारी, निवडक कर्मचारी, शास्त्रज्ञ, आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार आहेत. ग्रुपवर थेट शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना आंबा लागवडविषयी, तंत्रज्ञानची माहिती क्षणात मिळत होती. ग्रुपवरील तज्ज्ञ अनुभवी शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी मार्गदर्शन करतात. ग्रुपवर आंब्याचे मार्केटिंग प्रभावीपणे कसे करायचे याविषयी चर्चा घडवून आणली जाते. शेतकऱ्यांनी स्वत:हून 14 व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. याद्वारेही ते एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करीत आहेत.

*शेतकरी ते ग्राहक थेट विक्री*

व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकरी खरेदीदारांशी जोडला गेला आहे. यामुळे ग्रुपवर फळाबाबत चर्चा, फोटोसेशन होत आहे. यातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संधी प्राप्त झाली आहे. विक्रीसाठी प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ लागली आहे.

*यंदा आंब्याचे क्षेत्र वाढणार- बाळासाहेब शिंदे*

         मागील वर्षी भरपूर पाऊस झाला होता. यावर्षीही पाऊस चांगला झाला आहे. यामुळे यंदा आंबा लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्ह्यात केशर आंब्याची लागवड अतिघन पद्धतीने होत असून शेतकऱ्यांना एमआरईजीएस (महात्मा गांधी रोजगार हमी योजना)मधून मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यात आंबा उत्पादनाला पोषक वातावरण, खडकाळ, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल आंबा लागवडीकडे वाढणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

*आंबा उत्पादक संघाचे नियोजन-मदन मुकणे*

जिल्ह्यात डाळिंब, द्राक्षे या फळबागांचे संघ असल्यामुळे ते संघटित शेतकरी आहेत. मात्र आंबा, पेरू, ड्रॅगन फ्रुट यामधील शेतकरी संघटित नसल्यामुळे विक्रीवर परिणाम होतो. तालुका, जिल्हास्तरावर व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ उभी राहत आहे. त्यांच्या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या हेतूने तालुका, जिल्हास्तरावर आंबा उत्पादक व खरेदीदार संघ स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांनी सांगितले.