परळी (प्रतिनिधी) आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन विषयक विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शहरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. वाजत गाजत मोर्चाने जाऊन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. आंदोलनात आशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्या होत्या. अखेर खात्यात मानधनाची रक्कम जमा होईपर्यंत हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला यश आले असून तीन महिन्याचे मानधन खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

आशा व गटप्रर्वतकांना जुलै २०२१ मध्ये आशाना १५०० व गटप्रर्वतकांना १७०० ची वाढ झाली होती. ही वाढ एप्रील २०२२ पासून ५ महिण्याची देण्यात यावी.,आशा व गटप्रर्वतकांना सप्टेंबर २०२१ पासून आशाना २००० व गटप्रर्वतकांना ३००० ची वाढ झाली होती सदरील वाढ एप्रील २०२२ पासून देण्यात यावी., केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंतचा ६ महिण्याचा १००० प्रमाणे देण्यात यावा तसेच गटप्रर्वतकाचे सन २०२१- २०२२, २०२२ - २०२३ चे साड्याचा मोबदला देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आज दिनांक १६ रोजी परळी शहरात प्रचंड मोर्चाने पंचायत समिती कार्यालयावर जात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

बराच वेळ हे आंदोलन सुरू होते. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आशा व गटप्रवर्तकांनी ठिय्या धरला होता. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या मध्यस्थीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी संघटनेचे नेते काॅ. बी.जी. खाडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे, सरचिटणीस किरण सावजी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली व तीन महिन्याचे मानधन जमा करण्याचे आश्वासन दिले. तसेच रक्कम जमा करण्याची कार्यवाही तात्काळ करून दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात सुमारे १५० पेक्षा अधिक आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे नेते काॅ. बी.जी. खाडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे, सरचिटणीस किरण सावजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णा रेवले, उषा खाडे, अर्चना पांचाळ वर्षा कोकाटे उर्मिला शेंडगे,अनिता चाटे रामकुंवर कोथींबीरे,सविता होकेप्रशांत मस्के निर्मला भागवत, उर्मिला जोगदंड ,शेख शबाना, हेमा काळे ,सलमा अन्सारी, सुनिता होळंबे,छाया पोटभरे आदींनी परिश्रम घेतले.